Samyak Drishti Magazine for Photographers in India & World

cropped-logo-both
Edit Content
Click on the Edit Content button to edit/add the content.

Aug. 2020 Vol 01 | Issue 01

मुलाखत

शाहिदुल आलम यांची मुलाखत – श्रद्धा घाटगे
अनुवाद – चिराग देशपांडे

‘कला अस्वस्थ व्यक्तीला दिलासा देणारी आणि निवांत व्यक्तीला अस्वस्थ करणारी असली पाहिजे,’ अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. दिलासा देणाऱ्या कलेला भरभरून प्रेम मिळते मात्र दुसऱ्या प्रकारची कला बऱ्याचदा कलाकारालाच अडचणीत आणते. स्वतःच्या कलेतून, शब्दांमधून किंवा चित्रांमधून प्रश्न विचारणारे, निषेध व्यक्त करणारे, सत्य परिस्थिती दाखवणारे लोक सहसा कोणत्याही हुकूमशाही सरकारचे लाडके नसतात. मग या कलाकारांना सरकारच्या रोषाचा सामना करावा लागतो. काहीजण या दबावाला बळी पडतात तर काही त्याला पुरून उरतात आणि संघर्ष करत राहतात. शाहिदुल आलम हे बांगलादेशी फोटोजर्नालिस्ट, शिक्षक आणि कार्यकर्ते अशाच लढवय्यांपैकी एक.

चार दशकांहून अधिक कारकीर्द असलेले शाहिदुल आलम हे ड्रिक फोटो लायब्ररी व पाठशाला इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत आणि बांगलादेशातील ढाका येथे एकट्याच्या प्रयत्नातून चोबी मेला आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी महोत्सव आयोजित करतात. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील रस्ता सुरक्षा चळवळ आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल सरकारवर उघड टीका केल्याच्या कारणास्तव २०१८ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. माध्यमांनी आणि जगभरातील कलाकारांनी त्यांच्या सुटकेसाठी दबाव टाकल्यामुळे अखेरीस त्यांना जामिनावर सोडण्यात आले. आलमना टाइम्स पर्सन ऑफ द इयर (२०१८) आणि अलीकडेच २०२० चा आंतरराष्ट्रीय प्रेस फ्रीडम पुरस्कारही मिळाला. योगायोगाने, काही वर्षांपूर्वी ज्यादिवशी त्यांना अटक झाली होती त्याच दिवशी (५ ऑगस्ट) सम्यक दृष्टीने त्यांच्याशी संवाद साधला. अधूनमधून छानसे किस्से सांगत आणि मनमोकळी उत्तरे देत आलम त्यांच्या प्रवासाविषयी, ड्रिक फोटो लायब्ररीविषयी आणि फोटोग्राफी या उत्कट कलेविषयी भरभरून बोलले. या मुलाखतीचा काही निवडक भाग खालीलप्रमाणे:

Man reading a newspaper on the wall. Photo by Shahidul Alam

तुम्हाला २०२० चा आंतरराष्ट्रीय प्रेस फ्रीडम पुरस्कार मिळाला. माध्यमांच्या स्वातंत्र्याला तुमच्या दृष्टीने काय अर्थ आहे?

शाहिदुल आलम (एसए): माध्यमांच्या स्वातंत्र्याकडे मी शासन प्रक्रियेचे जंतुनाशक म्हणून बघतो. निकोप लोकशाहीसाठी आणि विकासासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. मूळात, ते एक अशी यंत्रणा निर्माण करते, जी अत्यंत अस्खलित असते; जिच्यात सत्तासंतुलन असते ज्यामुळे काही मूठभर हितसंबंधी गटांच्या हिताचा नव्हे तर, लोकांच्या हिताचा विचार केला जाईल हे सुनिश्चित केले जाते. इथे माध्यमांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित होतो. प्रत्येक वेळी शक्य नसले तरी ते त्यादृष्टीने प्रयत्न करू शकते.

डिजिटल सिक्युरीटी ॲक्टची बांगलादेशात पूर्ण ताकदीनिशी अंमलबजावणी केली जात आहे, याविषयी तुम्हाला काय वाटते?

एसए: त्यात खूप समस्या आहेत. अर्थात, असे अजिबात नाही की असे काही पहिल्यांदाच घडते आहे किंवा यापूर्वी इतर कुठल्याही सरकारने असे काही केले नाही. स्पेशल पॉवर्स ॲक्ट आहे, झालेच तर इन्फर्मेशन ॲन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) ॲक्ट २००६ चे कलम ५७ आहे. नवीन सरकारने तर आयसीटी कायदा बदलू, त्यात सुधारणा करू आणि तुमच्या शंकांची दखल घेऊ अशी आश्वासने दिली होती. पण सत्तेत आल्यावर त्यांनी त्या कायद्यात नवीन कलमांचा समावेश करून तो आपल्यासाठी अजून त्रासदायक करून टाकला. अनेक पत्रकार, कलाकार, लेखक, व्हिसल-ब्लोअर्स (गैरव्यवहार उघडकीस आणणारे), मतभेद असणारे यांना अगदी मध्यरात्री देखील पकडून नेण्यात आले. अर्थात, न्याय मिळवण्याचा मार्ग नाही आणि कुणालाही जामीन मिळत नाही. हे सर्व अतिशय भयानक आहे!

Students protesting during the Road Safety Movement in Dhaka, Bangladesh in 2018. Photo by Shahidul Alam

तुम्हाला देखील २०१८ मध्ये अटक झाली होती….त्याविषयी काही सांगा.

एसए: खरेतर, २०१८ साली याच दिवशी (ऑगस्ट ५, ज्या दिवशी ही मुलाखत घेतली गेली) मला अटक झाली होती. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे ४ तारखेला मी विद्यार्थ्यांच्या विरोधाचे प्रत्यक्ष रिपोर्टिंग करत असताना माझ्यावर हल्ला झाला आणि माझ्या उपकरणांची मोडतोड करण्यात आली. शस्त्रधारी गुंड निशस्त्र मुलांवर हल्ला करत होते. दुसर्‍या दिवशी परत मी बाहेर एफबी लाईव्ह फीड करत होतो, आणि अल जझीरासाठी एक मुलाखत करण्यासाठी घरी परत आलो. त्या रात्री मी एकटाच घरी होतो आणि दाराची बेल वाजली. मी खिडकीतून बघितले आणि दारात छोट्या केसांची एक तरूण मुलगी उभी होती जिने ‘अंकल शाहिदुल’ अशी मला हाक मारली. खरेतर त्यावेळीच मला शंका यायला हवी होती कारण माझे विद्यार्थी कधीही मला ‘अंकल शाहिदुल’ असे म्हणत नाहीत, मला वाटले ती माझ्या साथीदाराची विद्यार्थिनी असावी आणि मी दरवाजा उघडला, आणि अचानक बाहेर लपून बसलेली माणसे आत घुसली.

कसे आहे, मी बांगलादेशात राहतो, त्यामुळे हे सर्व काय आहे हे नीट मला माहित होते. म्हणूनच, हे घडल्यावर मला पक्के माहित होते की पुढे काय होणार आहे. त्यामुळे, मी शक्य तेवढा विलंब करायचा प्रयत्न केला. माझ्याबरोबर काय होत आहे हे निदान एखादया व्यक्तीला तरी माहित असावे यासाठी मी शक्य होईल तेवढ्या मोठयाने आरडाओरडा केला. त्यांनी मला फरफटत खाली नेले, माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली, हातात बेड्या घातल्या, आणि तिथून घेऊन गेले. अर्थातच, त्या रात्री त्यांनी माझा छळ केला. ती एक भयानक रात्र होती. पण दुसर्‍या दिवशी सकाळी ते मला पोलीस मुख्यालयाला घेऊन जात असताना, खिडकीतून कसेबसे मी माझ्या काही विद्यार्थ्यांना पाहिले. मला खात्री होती की, मी कुठे आहे हे माझ्या विद्यार्थ्यांना माहित असेल तर माझी मदत करण्यासाठी ते काहीही करतील.

कलाकारांना देण्यात येणार्‍या अशा क्रूर वागणुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, असे तुम्हाला वाटते?

एसए: उत्तर सोपे आहे. जेव्हा सरकार वैयक्तिक फायद्यापेक्षा जनहिताला प्राधान्य देईल, तेव्हाच त्यांच्यात बदल घडेल. पण माझ्यामते, सरकार बदलेल अशी अपेक्षा करणे अवास्तवी आहे, त्यांना बदलायला भाग पाडले तरच त्यांच्यात बदल घडेल. असे घडण्याची शक्यता नसल्यामुळे, नागरिकांनी आणि माध्यमांनी सतत सरकारचा विरोध केला पाहिजे आणि त्यांच्या कार्यावर लक्ष ठेवले पाहिजे. विद्यमान राजवटीतील दक्षिण आशियाई देशांमध्ये देखील – भारत व श्रीलंका, परिस्थिती वेगाने त्याच दिशेने जाताना दिसत आहे. हे अवघड आणि धोक्याचे आहे. विरोधकांना आणि व्हिसल-ब्लोअर्सना एकटे पाडले आणि संरक्षण दिले नाही की या राजवटींचे फावते. विरोध करणारे धाडसी तर नक्कीच आहेत पण, त्यांना पुरेसा पाठिंबा मिळत नाही. मोठ्या प्रमाणात विरोध झाला तर त्यापुढे सरकारचा टिकाव लागणार
नाही.

भारतात सीएए (नागरिकत्व दुरुस्ती कायदा) आणि एनआरसीला (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) विरोध झाला तेव्हा तो हाताबाहेर गेला होता. अजूनतरी बांगलादेशात तेवढ्या प्रमाणात विरोध झालेला नाही. विसंगती म्हणजे, बांगलादेशाचा इतिहास पाहता तेथील कलाकार, पत्रकार, कार्यकर्ते नेहमीच विरोध करत आले आहेत.

ज्या लोकांकडून विरोध होणे अपेक्षित आहे, ज्यांनी यापूर्वी आवाज उठवला होता, जे न्यायासाठी लढले होते, ते आज गप्प बसले आहेत. ही माझ्यामते अत्यंत चिंतेची बाब आहे. आपण मोठ्या संख्येने विरोधकांना, व्हिसल-ब्लोअर्सना पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून हे लोक एकटे पडणार नाहीत. यासाठी जबाबदार आणि कल्पक नेतृत्वाची देखील गरज आहे. याउलट, अगदी मोजके लोक जरी अशा प्रकारचे
नेतृत्व प्रदान करू शकल, तरी नाट्यपूर्ण बदल घडू शकतील.

Shahidul Alam with a Rohingya child. Photo by Md. Shahnewaz Khan

आजकाल पत्रकारिता आणि ॲक्टिव्हीझम यातील फरक धुसर होत चाललाय असे तुम्हाला वाटते का?

एसए: मी पत्रकारिता करतो कारण सहभाग आणि विरोध या दोन्हीसाठी ती एक प्रभावी यंत्रणा आहे. आणि त्यात मी कलेचा वापर करतो, कारण तिचा परिणाम खोलवर होतो. अवघड गोष्टी पत्रकारिता आणि कलेच्या माध्यमातून करता येतात. हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. मी स्वतः एक कार्यकर्ता आहे, एक कलाकार आहे आणि एक पत्रकार आहे, आणि त्याबाबतीत कोणताच संभ्रम असायचे कारण नाही. गोंधळ तेव्हा होतो जेव्हा या सर्व भूमिका पार पाडताना आपण त्यातला फरक विसरतो. एक पत्रकार म्हणून मी पत्रकारितेच्या नियमांच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे, मी न्यायबुध्दीने वागले पाहिजे. मी वस्तुनिष्ठपणे वागले पाहिजे असे म्हणणार नाही, कारण त्यामुळे आम्हाला स्वतःचे मत नाही असा समज होईल; आपल्या सगळ्यांची स्वतःची काही मते निश्चितच असतात. माझे राजकीय विचार मी जाहीरपणे मांडतो. मी कोणी दुसरा असल्याचा आव कधी आणला नाही. कुंपणाच्या एका बाजूला एखादी बलाढ्य व्यक्ती असेल आणि दुसर्‍या बाजूला एखादी दुर्बल व्यक्ती असेल, तर अशा वेळी मी कुंपणावर बसणार नाही. मी नक्कीच त्या दुर्बल व्यक्तीच्या बाजूने उभा राहीन आणि ते माझे स्वतःचे मत असेल. एकदा तुम्ही तुमचे मत स्पष्ट केले की कलाकार या नात्याने तुमच्या कलेचे सामर्थ्य वापरून तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता. पत्रकार म्हणून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नियमांच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. माझ्या मते आपल्या भूमिका परस्पर भिन्न नसतात.

ड्रिक फोटो लायब्ररी आणि पाठशाला मिडिया इंस्टिट्यूट याविषयी आम्हाला सांगा.

एसए: फोटो लायब्ररीची सुरुवात 1989 साली झाली आणि त्या काळी आपल्या आसपासच्या जगात कुठेही अशा प्रकारची फोटो लायब्ररी नव्हती. मला एक आफ्रिकन म्हण खूप आवडते – जोपर्यंत सिंहाला त्याच्या वतीने गोष्ट सांगणारा सापडत नाही, तोपर्यंत शिकार्‍याचेच कौतुक होत राहणार. आणि मी याच सूत्राचे पालन केले. तसे बघितले तर आपल्याबद्दलच्या बहुतांश गोष्टी या गोर्‍या-पाश्चात्य फोटोग्राफर्सनी सांगितल्या आहेत. ते विमानाने येतात, पहिले एक-दोन दिवस इथल्या पाण्याने त्यांचे पोट बिघडते, पुढचे काही दिवस ते फोटो काढतात आणि जे स्टॉक फोटो मिळवायच्या उद्देश्याने ते आले असतात, साधारण तसे मिळाले की निघून जातात. हे लोक शिकार्‍यांसारखे असतात, गोष्टीतल्या महत्त्वपूर्ण बारकाव्यांमध्ये त्यांना काहीच रस नसतो. यातील काही लोक तर आमच्या देशात गरिबी आहे, संघर्ष आहे, आम्हाला आपत्तींशी लढायला लागते एवढेच माझ्या देशाविषयी सांगतात. पण आमची ओळख फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. मला वाटते खरी गोष्ट आहे ती संकटावर मात करून पुन्हा उभे राहण्याच्या लोकांच्या वृत्तीची, दैनंदिन आयुष्यात सामना कराव्या लागणार्‍या प्रचंड दबावाशी दोन हात करण्यासाठी एकमेकांना मदत करण्याच्या त्यांच्या क्षमतेची.

Photo of old Pathshala building by Ashraful Huda
Photo of old Pathshala building by Farzana Hossen

आमच्याकडे इतरांसारखी समाज कल्याण व्यवस्था किंवा मदतयंत्रणा नसेलही, पण मला असे एकही कुटुंब माहित नाही जे दुसर्‍याला मदत करत नाही. आपल्या देशातील गरीब लोक एकमेकांची किती मदत करतात ही वस्तुस्थिती सांगितलीच जात नाही. ड्रिकची स्थापना करण्यामागची कल्पना हीच होती की, आपल्या ज्या गोष्टी जगाला कळायला हव्यात त्या सांगणे. पण आम्ही जसे पुढे जात राहिलो तसे आमच्या लक्षात आले की आम्ही एक लढाई लढत आहोत, आणि लढाई लढायची असेल तर योध्दे लागणारच. तुमच्या परीने तुम्हाला जेवढे जमेल तेवढे तुम्ही करू शकता. त्या अर्थाने हे चांगले जमून आले आहे, कारण यामुळे एकप्रकारे सामाजिक न्यायाच्या वातावरणात विद्यार्थ्यांचा विकास झाला आहे. आमच्या संघर्षांमधून त्यांच्या ज्ञानात भर पडली. त्यांची काम करायची पध्दत खूप वेगळी आहे. एका अर्थाने, ड्रिक आणि पाठशालाची जोडी ही हॉस्पिटल्ससारखी होती जिथे विद्यार्थी काम करता करता शिकतात. आणि, ड्रिक ही माध्यम संस्था असल्याने, विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या निर्मिती संस्थेचा चांगला उपयोग होतो. आमच्यासाठी पण हे चांगले आहे. आम्हाला चांगले विद्यार्थी हेरता येतात, जे नंतर आमच्यात सहभागी होतात. ड्रिकमुळे आम्हाला पाठशालाची स्थापन करता आली आणि या दोहोंमुळे चोबी मेला महोत्सवाची. आणि आता या तिघांची मिळून एक छान अशी इकोसिस्टिम तयार झाली आहे.

Chobi Mela – When the art reaches people on wheels. Photo by Habibul Haque/Drik

सध्याच्या पिढीत तुम्हाला काय फरक दिसतो? त्यांचे दृष्टीकोन कसे वेगळे आहेत? विशेषत: या सध्याच्या पिढीतल्या फोटोजर्नालिस्टचे.

एसए: मी एक स्वतःचे स्वतः शिकलेला फोटोग्राफर म्हणून कामाला सुरुवात केली. मी शक्य त्या प्रत्येक वाचनालयात जायचो आणि फोटोग्राफीवरचे प्रत्येक पुस्तक अधाशीपणे पाहायचो. मी ८०० पुस्तके वाचली असली तरीही त्यातून मला फारसे काही समजले नाही, पण तरीही मी हे वाचन केलेच. माझी शिक्षणाची भूक मोठी होती. पण तरीही हे खूप कठीण होते कारण मला कोणी गुरू नव्हता किंवा मार्गदर्शन करणारे लोक नव्हते. आज, मला वाटते, इंटरनेटने सगळया गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत. फोटोग्राफर्सना वेगवेगळ्या पद्धती नेटवर पाहायला मिळतात, लोक माहिती होतात, आधी आपण विचारसुद्धा केला नसेल अशा पद्धतीने आता त्यांच्याशी संवाद साधता येतो. हे चांगले असले तरीही, त्यामुळे लोकांना असे वाटू लागले आहे किंवा ते असे गृहीत धरतात की, सगळे फार सोपे आहे. पूर्वीपेक्षा आत्ता जाहिरातींचे क्षेत्र खूप प्रबळ झाले आहे. आणि तुम्हाला महान फोटोग्राफर होण्यासाठी कोणता कॅमेरा गरजेचा आहे व कोणती लेन्स आवश्यक आहे, हे सांगणाऱ्या उत्पादकांची आता अजिबात कमतरता नाही. या उपभोक्तावादी भडीमाराला बळी न पडणे अनेक लोकांना शक्य होत नाही. केवळ कॅमेरा सुरू करण्यासाठी शटर दाबण्याव्यतिरिक्त देखील या माध्यमात खूप काही आहे आणि फॅन्सी कॅमेरा व फॅन्सी लेन्सव्यतिरिक्त या शटर दाबण्यातही खूप काही आहे, हे विसरून लोक या सापळ्यात अडकतात. मला वाटते यापासून दूर जाणे हे फार महत्त्वाचे आहे.

१९०० च्या दशकाच्या सुरूवातीच्या काळातील न्यूयॉर्कमधल्या छोट्या गॅलऱ्यांचा मला हेवा वाटतो. तिथे युरोपियन बाजारपेठेशी जवळीक असलेल्या फोटोग्राफर्सचा गट होता. अनेक कलाकारांनी अन्सेल अडम्स, एडवर्ड वेस्टन अशा कलाकारांच्या सहयोगाने एकत्रितपणे काम केले. या कलाकारांनी त्यांचे पहिले काम न्यूयॉर्कमधल्या फोटोग्राफिक गॅलरीमध्ये प्रदर्शित केले. या प्रभावामुळे एक मेल्टिंग पॉट तयार झाला. आज, मला वाटते आपण जास्त एकटे राहून काम करतो. स्पेशलायझेशन्स नक्कीच असतात पण त्याचा अर्थ आपण कुंपणात राहून काम केले पाहिजे, असे नाही. आपल्याला एकमेकांकडून शिकण्यासारखे बरेच काही असते, पण कृत्रिम भिंती उभारून आपण एकमेकांत अंतर तयार करतो आणि परिपक्व होणे व शिकणे थांबवतो. भारतात काय परिस्थिती आहे हे मला माहिती नाही; पण बांगलादेशात बराच काळ फोटोग्राफीला पूर्णपणे वाळीत टाकले होते, कारण मुख्य प्रवाहातले कलाकार फोटोग्राफीकडे एक कलाप्रकार म्हणून बघायला तयारच नव्हते.

Photo of a rubble in Ballakot, Kashmir. Photo by Shahidul Alam

आमच्याकडे ३० वर्षांहून अधिक काळापासून आशियाई बिनालेचे (Asian Biennale) आयोजन केले जाते. कलाकारांकडून खूपच दबाव आल्यावर, शेवटी त्यांनी फोटोग्राफी आणि व्हिडिओचा समावेश केला गेला, तेही अगदी हल्ली, मागच्या दोन बिनालेंपासून. त्याआधी अशा प्रवेशिकांवर बंदी होती. आणि हे एकविसाव्या शतकात घडत होते! किती विचित्र आहे! कलाकारांबरोबरच आपल्याला कवी, लेखक, शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते अशा लोकांशी संवाद साधण्याची गरज असते आणि अशा वैविध्यपूर्ण वातावरणातच आपण चमकतो, बहरतो!

तुम्हाला सध्याच्या सामाजिक माहितीपटांच्या स्थितीबद्दल काय वाटते?

एसए: अनेक वर्षांपूर्वी, रॉबर्ट प्लेज, मी आणि इतर काही फोटोग्राफर्स बार्सिलोनामध्ये एका महोत्सवाला गेलो होतो आणि एकाने एक मनोरंजक निरीक्षण सांगितले. “पिट्सबर्गबद्दल एवढी अफाट कलाकृती बनवणारा महान युजीन स्मिथ आज असता तर, त्याने या कथा त्याचप्रकारे सांगितल्या असत्या का?” मला हा प्रश्न फार आकर्षक वाटला. प्रत्येकाला त्याची किंवा तिची जागा एका विशिष्ट वातावरणात सापडते. आपण वेगवेगळ्या श्रोत्यांशी बोलतो, आणि तसे करताना आपल्याला त्यांच्याशी जोडून घेण्याचे वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. उदाहरणार्थ, संवाद साधण्याचे जुने मार्ग – एलिझाबेथच्या काळातले लेखक वापरत असत ते – ही कदाचित आजच्या काळातल्या आत्ताच्या पिढीशी बोलण्यासाठी योग्य भाषा नसेल. मला वाटते बऱ्याच काळापासून फोटोग्राफर्सनी शुद्ध (प्युअर) असण्याची कल्पना स्वीकारली आहे, किंवा शुद्धतावादी म्हणू हवे तर, आणि त्यांनी गोष्ट सांगण्याचा एक विशिष्ट मार्गच निवडलेला आहे. सगळी परिस्थिती बदलली आहे आणि काळाशी सुसंगत असण्यासाठी आपणसुद्धा बदल केले पाहिजेत, हे ते विसरले आहेत.

आता वेगवेगळ्या प्रकारे गोष्ट सांगणारे लोक आहेत आणि आता सामाजिक माहितीपट म्हणजे गोष्ट सांगण्याची कृष्णधवल, क्लासिकल, फोटोग्राफिक, एकरेषीय पद्धत राहिलेली नाही. आता अमूर्तता आली आहे, संकल्पनात्मक काम आले आहे आणि सध्या ज्याला सामाजिक माहितीपट म्हटले जाते, त्या माध्यमाने या सगळ्याचा स्वीकार केला आहे. मला वाटते या सगळ्यामुळे फायदाच होतो. आता आपल्याकडे पूर्वीपेक्षा जास्त बारकावे, कधीकधी जास्त गुंतागुंत असलेली पण अधिक समृद्ध शब्दसंपत्ती आहे. मात्र, मला वाटते की आजच्या युवा फोटोग्राफर्सनी त्यांच्या कामाला क्लासिकल टच देण्याच्या या शक्यता आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.

एखादी गोष्ट सांगण्यासाठी एखादा फोटो क्लिक करण्याची तुमची प्रक्रिया आम्हाला समजावून सांगा.

एसए: ‘क्लिकिंग’ आणि ‘स्नॅपिंग’ या शब्दांना माझा आक्षेप आहे कारण त्यामुळे फोटोग्राफी म्हणजे शोधणे आणि गोळा करणे, आहे असा समज होतो, ज्याबद्दल बऱ्याचदा बोलले गेले आहे. नक्कीच, फोटोग्राफी एक उत्स्फूर्त प्रक्रिया आहे आणि काही वेळा आपल्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा लागतो, पण त्यामुळे ही केवळ एक टिपण्याची प्रक्रिया होत नाही. ही त्याहीपेक्षा खूप सखोल आणि सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे आणि माझ्या मते, जे फोटोग्राफर्स सर्वोत्तम काम करतात, त्यांनी ही प्रक्रिया आत्मसात केली आहे. काही फोटोग्राफर्स युद्धासारख्या परिस्थितीत सुंदर, जबरदस्त काम करतात. अर्थात, ते खूप जलद हालचाली करतात, अवघड परिस्थितीत ते उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात. त्यांना हे जमते कारण कॅमेरा हे त्यांचे स्वत:चेच एक्सटेन्शन असल्याच्या प्रक्रियेतून ते गेलेले असतात. मी हेतुपुरस्सर म्हणतो की आपण जाणतेपणाने ‘क्लिकिंग’ आणि ‘स्नॅपिंग’ या शब्दांपासून लांब गेले पाहिजे कारण आपण फोटोग्राफी जशी
आहे तशी केली पाहिजे.

तुमच्या प्रश्नाकडे परत यायचे तर, माझ्या बर्‍याचशा कामाला संशोधन करावे लागते. मी फोटो काढण्यासाठी व्यतीत करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ नियोजन आणि संकल्पना तयार करण्यावर व्यतीत करतो. एक अगदी टोकाचे उदाहरण द्यायचे तर, मी कल्पना चकमा, या एका गायब झालेल्या आदिवासी स्त्रीवर केलेली पहिली स्टोरी ही मी विकसित केलेले फोरेन्सिक तंत्रज्ञान तपासून बघण्यासाठी होती कारण मला काही मुक्या साक्षीदारांना प्रश्न विचारायचे होते. त्यामुळे, कल्पनाचे अपहरण झाले त्या दिवशी तिने केलेल्या शेवटच्या प्रवासाचा मार्ग मी अनुसरला कारण तपासामध्ये, लोकांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना काहीही महत्त्व दिलेले नव्हते आणि फक्त लष्कर आणि बंगाली स्थायिकांची मते विचारात घेतेली होती. त्यामुळे चालत असताना ज्या दगडाला ओलांडून, ज्या झाडाच्या सालीला, पानाला स्पर्श करून ती पुढे गेली, त्यांना प्रश्न विचारायचे, असे मी ठरवले. हेच ते माझे साक्षीदार होते, ज्यांना मला प्रश्न विचारायचे होते. मी हे तंत्रज्ञान विकसित केले, ज्याची सुरुवात बांगलादेशात झाली आणि नंतर मी ब्रिटन, जर्मनीमध्ये काम केले. शेवटी, मला ब्रिस्बेनमध्ये एक वैज्ञानिक प्रयोगशाळा सापडली, जिथे मी या कामाची ओळख करून दिली. म्हणजे, मी प्रत्यक्ष ऑस्ट्रेलियाला गेलो आणि सलग १२ तास फोटोग्राफ्स तयार करण्यात घालवले आणि त्या आधी ६-७ महिने नियोजन, प्रयोग करणे, तपास करणे आणि सर्व शक्यतांवर काम करण्यावर घालवले. प्रत्यक्ष फोटो काढण्यासाठी मला एक संपूर्ण दिवससुद्धा लागला नाही!

© Shahidul Alam / Network Photographers Image Ref: SAB-10149710.psd ‘Positive Lives, Malaysia’

फोटोग्राफी या माध्यमाचा वापर करून बदल घडवून आणणे किती आव्हानात्मक आहे?

एसए: माझ्या मते सगळ्यात मोठे आव्हान स्वतःच्या चुका ओळखणे हे आहे. सहसा त्या आपल्याला कधीच दिसत नाहीत. स्वतःला सल्ला देणे, स्वतःला प्रश्न विचारणे, आपली काय चूक झाली आहे ते ओळखणे हे आपण कधीच शिकलेलो नसतो. सहजप्रवृत्तीने आपण आपली स्तुती करणाऱ्या, टीका न करणाऱ्या किंवा प्रश्न न विचारणाऱ्या लोकांच्या घोळक्यात वावरणे पसंत करतो. आणि कोणत्याही व्यक्तीसाठी हे सर्वात धोकादायक वातावरण असते. सतरा वर्षांचा असताना मी बांगलादेश सोडले आणि 12 वर्षे परदेशात राहिलो. एकदा मला जाणीव झाली की मी माझ्या आई-वडिलांना देखील नीटसा ओळखत नाही आणि त्यामुळे मी बांगलादेशात परत येण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी देखील हे अवघड असणार आहे हे मला माहिती होते. ते दोघेही खूप स्वतंत्र विचारांचे, सुशिक्षित आणि पुरोगामी होते. दक्षिण आशियातल्या आपल्या बहुतांश मध्यमवर्गीय घरांमध्ये घरकामात मदतनीस असतात. आपण लोक स्वतःबद्दल खूप छान छान बोलतो, पण एकंदर आपण एक खूप मोठा वर्ग-आधारित समाज आहोत, ज्यात प्रचंड विषमता आहे. आपल्या आणि त्यांच्या (कष्टकरी वर्गाच्या) आयुष्यांमध्ये खूप फरक आहे. आपण हे विसरतो की, बऱ्याचदा अन्याय करणारे आपणच असतो. माझे आई-वडील घरात बसून टीव्ही बघत असताना आणि मिझान नेहमी बाहेर बसून टीव्ही बघायचा आणि ह्या गोष्टीचे आई-वडिलांना आणि स्वतः मिझानला देखील कधीच वावगे वाटले नव्हते. पण मला ते खटकले, मग मी विचार केला की मी काय करू शकतो? एक फोटोग्राफर म्हणून मी त्या दृश्याचा फोटो काढला.

तसेच, त्याकाळात बांगलादेशातील कॅलेंडर्सवर नेहमी सुंदर सुंदर चित्रे असायची. बऱ्याचदा सुंदर स्त्रिया, निसर्ग, फुले, मशिदी आणि अशा इतर अनेक गोष्टींची. कॅलेंडर्सवर सामाजिक संदेश नसायचे. अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे १९९०च्या दशकापासून आम्ही आमच्या कॅलेंडर्सचा वापर सामाजिक संदेश देण्यासाठी केला. त्यावर्षी मी माझ्या स्वतःच्या कामावर एक कॅलेंडर केले होते, कारण मला मार्मिक आणि डिजिटल चित्रांपेक्षा प्रत्यक्ष काम दाखवायचे होते. म्हणून त्या कॅलेंडरमध्ये आम्ही दोन चित्रे छापली होती. एक होते, एका मंत्र्याच्या घरात टीव्ही बघत असलेल्या श्रीमंत मुलांचे. त्यात एका मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीसमोर बसून काही गुबगुबीत मुले टीव्ही बघत होती आणि पुढचे चित्र होते आमच्या घराच्या बैठकीच्या खोलीबाहेर बसून टीव्ही बघत असलेल्या मिझानचे. ते कॅलेंडर प्रकाशित झाल्यानंतर मी त्याची एक कॉपी मिझानला दिली आणि दुसरी माझ्या आईला आणि दुसऱ्या दिवशी तो आमच्या घराच्या आत बसून टीव्ही बघत होता. आम्हा सर्वांसाठी हे खूप मोठे पाऊल होते.

Woman cooking on the rooftop of her house during floods in September 1988. The water went up another three feet. Photo by Shahidul Alam

आजवर इतक्या संकटांचा सामना करून सुद्धा अजूनही तुमचे कार्य सुरू आहे, हे कसे काय?

एसए: मी जे काही करतोय त्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी ते करतो. आपल्यापैकी अनेक जण असा एखादा पेशा निवडतात ज्यामुळे त्यांना नोकरी मिळते, जी जगण्यासाठी महत्त्वाची असते. मग आपण मोठे होतो, मुलांना जन्म देतो, कर्ज काढतो, मेडिकल इन्शुरन्स काढतो आणि मग आपण मरून जातो. जर आपण याच मार्गावरून चालणार असून तर माझ्या दृष्टीने तो फारच अर्थहीन मार्ग आहे. हे काही जगण्याचे कारण असू शकत नाही. केवळ भौतिक सुखे मिळवण्यात यशस्वी होण्यापेक्षा, जगण्याला आणखी काहीतरी अर्थ असायला हवा. माझ्याकडे अमर्याद वेळ आणि प्रचंड पैसा असता तर मी जे जे काही केले असते अगदी तेच मी आजदेखील करतोय. मी नशीबवान आहे की लोक मला हे करण्याचे पैसे देतात. मी रोज सकाळी माझे काम करण्यासाठी उत्साही असतो. माझ्यामते बहुतेक माझ्यात एक कायमची झिंग आहे.

ती तुम्हाला एक निश्चयी व्यक्ती बनवते. मी जे काही करत आलोय ते करण्यात मला कधीच कोणतीही समस्या जाणवली नाही. होय, पण कधीकधी धोरणीपणे वागणे आणि काही गोष्टींना लगाम घालणे आणि काहीवेळा बेधडक सडेतोडपणा हाच सर्वोत्तम मार्ग नसतो हे समजून घेणे मला नेहमीच अवघड गेले आहे. छोट्याश्या लढाईच्या विपरीत, एखाद्या युद्धात मात्र काहीवेळा धोरणात्मक माघार घ्यावी लागते, काही काळ शांत पडून राहावे लागते, या गोष्टी मला सहजपणे जमत नाहीत, कारण मला सतत पुढे जायचे असते. हे सर्व धडे मी शिकलो आहे. आणि आता मी प्रत्येक वेळेस हातोडा घेऊन मैदानात उतरत नाही, तर कधीकधी शस्त्रक्रिया करणाऱ्या एखाद्या सर्जनप्रमाणे काम करतो.

फोटोग्राफी या विषयावर फारसे लेखन का झालेले नाही?

एसए: हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मी स्वतःला आधी एक कथाकार म्हणून पाहतो आणि मग एक फोटोग्राफर म्हणून पाहतो. एक कथाकार म्हणून एखादी व्यक्ती, गोष्ट यशस्वीपणे सांगण्यासाठी आवश्यक असेल असे कोणतेही साधन किंवा माध्यम वापरते जसे की शब्द, चित्र, संगीत किंवा नृत्य. मी फोटो काढतो आणि लिहितो. हे एक खूप शक्तिशाली कॉम्बिनेशन आहे.

मात्र, बऱ्याचदा लोक फोटोग्राफीकडे वळण्याचे एक कारण हे देखील आहे की, त्यांना वाटते त्यांना लिहावे लागणार नाही. पाठशाला किंवा इतर संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांचाही यात समावेश आहे. होय अनेक फोटोग्राफर्स लिखाण करत नाहीत, जो फोटोग्राफीच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना खूप छान पूरक आहेत. उत्तम लेखक या नेहमी व्हिज्युअल व्यक्ती असतात. त्याचप्रमाणे मला वाटते की फोटोग्राफर्स, दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरतील अशा इंटरेस्टिंग पद्धतीने शब्दांचा वापर करू शकतात. आज मला जाणवते की, फोटोग्राफीबद्दल उत्तम प्रकारे लिहू शकतील असे खूप कमी लोक आहेत. आणि याचे एक कारण हे देखील आहे की फोटोग्राफीला आजपर्यंत इतर व्यवसायांनी कधीच गांभीर्याने घेतलेले नाही. अगदी माध्यमांमध्ये देखील याला एक कनिष्ठ दर्जाची कला म्हणून पाहिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या वृत्तपत्र संस्थेत श्रेणीच्या क्रमवारीत फोटोग्राफर हा सर्वात खालच्या पायरीवर असतो. त्यांना अडाणी समजले जाते. अर्थात असाही एक काळ होता जेव्हा फोटोग्राफर्सना त्यांची कॅप्शन्स लिहिण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागायची. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पण जे लोक फोटोग्राफर्सना अशिक्षित समजतात, ते बऱ्याचदा हे विसरतात की ते स्वतः व्हिज्युअल बाबतीत अशिक्षित असतात. आणि, व्हिज्युअल साक्षरता ही पूर्णपणे सत्य गोष्ट असून साक्षरतेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ही गोष्ट कधीच कोणाला पटलेली नाही. आपण आपल्या शाळांमध्ये व्हिज्युअल साक्षरता शिकवतच नाही.

A man and two children from the char areas in river Brahmaputra look for safer shelter. The river is notorious for eroding its banks. Photo by Shahidul Alam.

आज आपल्या मनांवर व्हिज्युअल्स, राजकारणी, जाहिराती, ॲक्टिविस्ट यांचा इतका प्रभाव आहे की चित्रांचा महापूर आल्याप्रमाणे लहानपणापासून आपण आपल्या आयुष्यात चित्रांच्या प्रभावाखाली असतो. आणि तरीदेखील आपल्याला चित्रे कशी वाचायची, त्यांचा अर्थ कसा लावायचा, त्यांच्याशी कसे लढायचे आणि गरज पडल्यास त्यांचा मोह कसा आवरायचा हे शिकवले जात नाही. आपण चित्रांचा मोह आवरण्यास असमर्थ आहोत, कारण आपण एखाद्या स्पंजप्रमाणे सर्वकाही शोषून घेतो. व्हिज्युअल साक्षरतेला पूर्वीपासून महत्त्व दिले असते तर आणि इतर व्यवसायांनी देखील व्हिज्युअल साक्षरतेला एक वैध भाषा मानले असते तर ते ती अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकले असते. फोटोग्राफर्सनी देखील व्हिज्युअल साक्षरतेला शिकण्याचा एक महत्त्वाचा अनुभव मानले असते, तर तेदेखील अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकले असते. फोटोग्राफर्सना स्वतःला लेखन करता येत नसल्याने, या माध्यमाचे फारसे ज्ञान नसलेल्या लोकांना फोटोग्राफीबद्दल लिहायला सांगितले जाते, तेव्हा खरी समस्या निर्माण होते. त्यामुळे आज असे अनेक लोक आहेत ज्यांना या माध्यमाची फारशी समज नसून देखील ते याबद्दल लिहित आहेत, आणि त्यामुळे जे काही लिहिले जात आहे ते प्रचंड कंटाळवाणे आहे.

तुमच्या अटकेचा तुमच्या ध्येयावर काही परिणाम झाला आहे का?

एसए: माझ्यामते त्यामुळे मला अनेक प्रकारे मदत झाली आहे. कोणत्याही व्यक्तीला अटक होण्याची आणि छळ केला जाण्याची आणि आणखी काय काय घडेल याची नेहमी भीती असते. मला हे पक्के माहीत होते की ते माझ्यासोबत काय करू शकतात आणि मी त्याचा सामना करू शकतो. म्हणून मी आता अधिक सशक्त बनलो आहे, असे मला वाटते. कारण अज्ञाताची ही भीती आता अज्ञात राहिलेली नाही. कदाचित ते एवढ्यावर थांबणार नाहीत, कदाचित ते माझा काटा काढतील, मला माहित आहे की ते जे काही करू शकतात ते मी सहन करू शकतो. मात्र, खरा त्रास मला नाही तर माझ्या कुटुंबाला, मित्रांना आणि माझ्या समर्थकांना सहन करावा लागला. माझे नसणे त्यांना सहन करावे लागले, त्यांना आर्थिक, कायदेशीर आणि सुरक्षेच्या समस्यांना सामोरे जावे लागले. एक मोठा गट बराच काळ प्रचंड ऊर्जेने आणि वेगाने माझ्यासाठी झटत होता. त्या प्रक्रियेतून जी एकता निर्माण झाली ती अभूतपूर्व होती. माझे जगभर विखुरलेले सर्व मित्र होते जे देखील नंतर आम्हाला सामील झाले आणि त्याद्वारे मिळालेला पाठिंबा अभूतपूर्व होता. शिवाय या अटकेमुळे आम्ही करत असलेले कार्य ठळकपणे लोकांच्या समोर आले.

मी माझा तुरुंगातला माझा वेळ खूप उत्पादकपणे वापरला. मी जेलमध्ये दररोज छान मुलाखती घेतल्या. मी अशा लोकांना भेटू शकलो ज्यांना सर्वसामान्य परिस्थितीत भेटणे कठीण असते. पण तुम्हाला सांगतो, तुरूंगात असताना एखाद्याची अपॉईंटमेंट मिळवणे इतके अवघड नसते. ती व्यक्ती भेटायला उपलब्ध आहे की नाही याची आपल्याला चिंता करावी लागत नाही. यामुळे मला प्रचंड अंतर्ज्ञान मिळाले. याशिवाय तुरुंगात असताना माझी अनेकांशी असाधारण मैत्री झाली. उदाहरणार्थ, चोबी मेलासाठी आम्हाला एका दिवसात १०००-सीटर जागा शोधावी लागणार होती आणि कोणालाही स्वतःला ‘शाहिदुलचा मित्र’ म्हणून दिसू द्यायचे नव्हते. आम्हाला एक जागा सापडली, पण ती बुक कशी करायची हे आम्हाला ठाऊक नव्हते, मी माझे जेलमधील संपर्क वापरले! काम फत्ते झाले! मी माझ्या जेलमधील मित्रांच्या संपर्कात राहतो आणि बर्‍याच गोष्टी एकत्र करत असतो.

Portrait of Nelson Mandela, former president of South Africa, during his visit to Muhammad Yunus, Nobel Peace Prize winner from Bangladesh. Photo by Shahidul Alam
A woman in a makeshift voting booth in Lalmatia, Dhaka, casts her vote after the removal of autocratic General Hussain Mohammad Ershad after a sustained people’s movement for democracy. Dhaka. Bangladesh. Photo by Shahidul Alam

सध्या मी तुरुंग सुधारणेवर खूप काम करतोय – आम्ही त्यांना एक म्युझिक बँड स्थापन करायला मदत केली आहे (त्यांनी सुमारे ४० गाणी लिहिली आहेत), तुरुंगाच्या आत म्युरल पेंटिंग (भित्तिचित्रे) करण्यात देखील आम्ही सहभाग घेतला होता आणि आता संपूर्ण परिसरात सुमारे ५० म्युरल आहेत, त्यापैकी काही ३० फुटांहून अधिक रुंदीची आहेत. तुरुंगाचा अंतर्भाग आता एखाद्या म्युझियम प्रमाणे दिसतो. हे बदल आम्ही घडवून आणू शकलो आणि यामुळे मला आता अजून आशा आहे. बांगलादेशातील लोक आता मला ओळखू लागले असल्यामुळे एक अशी इंटरेस्टिंग घटना घडली जी माझ्या कायम स्मरणात राहील – एका नवजात बाळाला घेऊन एक स्त्री माझ्याकडे आली आणि तिने मला तिच्या बाळाला आशीर्वाद द्यायची विनंती केली. ती म्हणाली, “हा मोठा झाल्यावर तुमच्यासारखा निडर व्हावा अशी माझी इच्छा आहे.” एखाद्या व्यक्तीला मी अशी एखादी भावना देऊ शकतो, जिला मी अन्यथा कधीही भेटलो नसतो (जर माझ्या अटकेने लोकांचे लक्ष वेधून घेतले नसते तर), आणि एखाद्याला आशा देऊ शकतो, ही एक प्रकारे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

इतर संस्थांप्रमाणेच तुमच्या संस्थांनासुद्धा कोव्हिडचा बराच फटका बसला असेल… लोकांना संघटित करण्याचा इतर कोणता मार्ग आहे का? तो किती अवघड आहे?

एसए: सध्यातरी हे प्रचंड अवघड दिसत आहे. छळ आणि कोव्हिड-19 या दोघांची एकत्रितपणे आमच्यावर कुऱ्हाड कोसळली आहे. आम्ही अत्यंत डळमळीत परिस्थितीत आहोत, कारण सध्या बांगलादेशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. आम्ही एका नव्या इमारतीत शिफ्ट करण्याचा विचार करत होतो आणि त्या इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही काही पैसे बाजूला काढले होते, जे आम्ही एका पतसंस्थेत डिपॉझिट केले होते. अर्थव्यवस्था कोसळल्याने कोणतीही पतसंस्था पैसे परत देण्याच्या स्थितीत नाही आणि त्यामुळे आम्ही साठवलेले पैसे अडकून पडले आहेत. त्यामुळे आम्हाला आता इमारतीचे काम पूर्ण करणे शक्य होत नाहीये. आम्ही क्राऊड-फंडिंगद्वारे काही निधी उभारण्याचा विचार करत आहोत. जर आम्ही त्वरित काही उपाययोजना करू शकलो नाही तर ड्रिक आणि पाठशाला या दोन्ही संस्था बंद कराव्या लागतील.

New Pathshala Building

एक व्यावसायिक माध्यम म्हणून आपण फोटोग्राफीचे संरक्षण कसे करायला हवे, विशेषतः त्याच्यावर देखील आता डिजिटल पाळत (सर्व्हेलन्स) ठेवली जात असताना? प्रेक्षकांशी, समुदायाशी संवाद साधण्यासाठी किंवा योग्य चित्राद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या प्रकारचे बदल करावे लागतील?

एसए: आपल्या सर्वांकडे पेन किंवा पेन्सिल असते, पण याचा अर्थ आपण सगळेच लेखक असतो असा होत नाही. पण फोटोग्राफीच्या बाबतीत मात्र, आपण सगळे फोटो काढू शकतो या गोष्टीची तुलना निश्चितपणे आपण फोटोग्राफर असण्याशी केली जाते. माझ्या मते फोटोग्राफीचे लोकशाहीकरण होत आहे, आणि या माध्यमासाठी ही चांगलीच गोष्ट आहे. एक काळ असाही होता जेव्हा आमचे स्थान इतके अबाधित होते की आम्ही स्वतःच्या स्थानावर आत्मसंतुष्ट बनण्याचा धोका निर्माण झाला होता. मी जे काम करतो आहे, ते इतर अनेक फोटोग्राफर्स इतर अनेक पद्धतींनी करू शकतात, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. म्हणूनच, माझे काम इतके उत्तम व्हायला हवे की ते इतरांपेक्षा वरचढ ठरेल. एक वेळ अशी होती की, जेव्हा केवळ योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे पुरेसे होते. आज अशी परिस्थिती आहे की, योग्य वेळी योग्य ठिकाणी बरेच लोक असू शकतात. त्यामुळे केवळ तेवढ्यावर अवलंबून राहणे चालणार नाही. तुम्हाला त्या परिस्थितीत काहीतरी व्हॅल्यू ॲड करावी लागेल. एखाद्या दृश्याकडे पाहण्याच्या तुमच्या दृष्टिकोनामुळे, तुम्ही जे काही देता आहात ते वाचण्याचा अनुभव अधिक दर्जेदार व्हायला हवा. हे करण्यासाठी तुम्हाला केवळ फोटो काढण्याच्या कृतीच्या पलीकडे जाऊन सौंदर्यात्मक, बौद्धिक, वैचारिक लिहिता येणे आवश्यक आहे.

आणखी एक पैलू ज्याबद्दल मी बोलू इच्छितो ते म्हणजे अर्काइव्ह्ज. फोटोग्राफी ही बऱ्याच अंशी संग्रह आणि स्मरणात ठेवण्याबद्दल आहे. आता, प्रत्यक्ष जीवनात आपली स्मरणशक्ती ही खूप निवडक असते, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या जे काही टिकून राहिले आहे त्यापैकी बरेचसे, केवळ काही फोटोंमुळेच आहे. आणि हे काही विशिष्ट व्यक्तींच्या हाती असल्यामुळे, काही विशिष्ट घटना लक्षात ठेवल्या जातात आणि इतर विस्मृतीत जातात. म्हणून, असा अफाट इतिहास आहे जो केवळ या कारणाने आज अस्तित्वात नाही कारण त्या काळच्या फोटो-इतिहासकारांना तो लक्षात ठेवला जाणे महत्त्वाचे वाटले नव्हते. माझ्या मते, हे माध्यम आज इतके बहुसत्ताक झाले आहे, याचा अर्थ नक्कीच इतर काही मार्ग असणार.

Lord Terence Kearley 3rd Viscount Devonport with his friends and his daughter go on the last grouse hunt of the season near their family estates in Kirkwhelpington, Northumberland. Photo by Shahidul Alam

फोटोग्राफीबद्दल आणखी लेखन करण्यासाठी काय करावे लागेल? फोटोग्राफीच्या क्षेत्रात जे काही ठळक काम झाले आहे त्यावर लिहू शकणारे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच लोक आहेत.

एसए: दुर्दैवाने संपूर्ण जगभर हीच परिस्थिती आहे. हा एक अत्यंत गंभीर मुद्दा आहे, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मला असे वाटते की, ही गोष्ट फोटोग्राफीच्या शिक्षणाशी देखील निगडीत आहे. जगभरात अशा अनेक प्रशिक्षण संस्था आहेत ज्या मुख्यत्वेकरून फोटोग्राफीचे तंत्र शिकवतात – जो फोटोग्राफीच्या प्रक्रियेचा एक फार छोटा भाग आहे. ड्रिक आणि पाठशालामध्ये आम्ही एक गोष्ट आवर्जून करतो ती म्हणजे – आमची बी.ए.ची पदवी सामाजिक शास्त्रांच्या अंतर्गत आहे, मिडीया किंवा कलेच्या नाही. त्यामुळे तुम्हाला सामाजिक शास्त्रांचा पार्श्वभूमीवरच फोटोग्राफी शिकावी लागते. याशिवाय आम्ही क्रिएटिव्ह रायटिंग, मीडिया स्टडीज्, पर्यावरण, तत्वज्ञान यांचादेखील विचार केला आहे. फोटोग्राफर हा माणूस म्हणून परिपूर्ण घातला पाहिजे हे आम्ही जाणतो. गोष्टी चांगल्या प्रकारे सांगण्यात सक्षम बनण्यासाठी तो स्पष्टवक्ता, माहितीपूर्ण, ज्ञानी असायला हवा. चांगल्या फोटोग्राफीचा हाच पाया आहे. अर्थात, आमच्या शिक्षण संस्थांमध्येही हे अजून घडत नाही. पण माझ्यामते हे घडायला हवे. इतर (सामान्य) भाषांच्या माध्यमातून आमच्या माध्यमाबद्दल बोलण्यासाठी जिम्नॅस्टिकसारखी एक विशिष्ट पातळी आवश्यक असते. व्यायाम करताना ज्याप्रकारे आपण कमजोर असलेल्या स्नायूंवर विशेष मेहनत घेतो, त्यासाठी विशिष्ट निवडक व्यायाम करतो, त्याचप्रकारे लेखन हा आमचा सर्वात कमकुवत स्नायू आहे, आणि तो निवडक प्रयत्नांनी बळकट करायला हवा आणि हे आम्ही ओळखायला हवे. आम्ही आमच्या कलेला गांभीर्याने घेतले पाहिजे.

Smriti Azad used to attend political rallies with her sister when she was a child. As a singer and a performer, she was involved with the women’s movement, the committee demanding the trial of war criminals and the cultural group Charon Shangshkritik Kenro, which led to her joining the cultural group Shommilito Shangshkritik Jote. As part of that group she was active in the movement to bring down general Ershad. Here, Smriti was protesting at a rally at Shahid Minar. Dhaka, Bangladesh, 1994. Photo: Shahidul Alam/Drik/Majority World

आजच्या उदयोन्मुख फोटोजर्नालिस्टना तुम्ही काय संदेश द्याल?

एसए: धोके पत्करा. कोणतीही अर्थपूर्ण गोष्ट करण्यास इच्छुक असलेल्यांना मी हाच सल्ला देईन. सांस्कृतिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र वा धार्मिक क्षेत्र असो किंवा ज्या कलात्मक अवकाशात आत्ता आपण आहोत ते असो, आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो तेव्हा आपण आत्मसंतुष्ट बनतो. प्रत्यक्षात तिथे फार काही घडत नसते. तरीही, आपल्या यंत्रणा सुमारपणाचा गौरव करण्यासाठी डिझाईन केल्या आहेत. जो इतरांसारखा नसतो त्याला ॲबनॉर्मल मानले जाते. सर्वसामान्य असण्यात काय विशेष आहे हे मला समजत नाही. जवळपास सगळ्या क्षुल्लक गोष्टी तुम्ही सामान्यतेचे पालन करण्यावर आधारित असतात, आणि ॲबनॉर्मल असलेले सर्व हे वाईटच आहे अशीच जणू काही व्याख्या केलेली असते. जर आपण उत्क्रांती पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, आपण होमो सेपियन आहोत आणि जिथून आपली सुरुवात झाली ते बॅक्टेरिया नाही, याचे कारण म्हणजे निसर्गाने काही चुका केल्या, त्याने काही धोके पत्करले आणि ते धोके स्वीकारले आणि कित्येक गोष्टी वाईट घडल्या असून देखील ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्यांचा स्वीकार केला. आणि, तरीही आपल्या यंत्रणांमध्ये, केंद्राच्या बाहेर असण्यास विरोध केला जातो. कलेच्या क्षेत्रातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे, कडा एकमेकांवर आदळतात तेव्हा सर्वात इंटरेस्टिंग गोष्टी घडतात. त्याच ठिकाणी तुम्ही फटींमधून खाली देखील पडू शकता.

मी सुद्धा असे सुचवेन की, प्रत्येकाने आपल्या व्यवसायाबाहेरील व्यक्तींशी बोलले पाहिजे आणि कोणतीही गोष्ट गृहीत धरता कामा नये. आणखी एक गोष्ट आहे, जी इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा महत्वाची आहे – सतत प्रश्न विचारत रहा, विशेषतः स्वतःला.


Shraddha Ghatge

Member, Editorial Team

Shraddha Ghatge is Mumbai-based independent journalist covering social, health, and civic issues. She has written for Firstpost, Newslaundry, People’s Archive of Rural India, Deccan Chronicle and Zeit.de. She has also worked with Mumbai Mirror, Firstpost, and on research projects with Tata Institute of Social Sciences, Mumbai. She has been a content writer for photo documentation on social issues in collaboration with well-known photojournalist Sudharak Olwe.