Samyak Drishti Magazine for Photographers in India & World

cropped-logo-both
Edit Content
Click on the Edit Content button to edit/add the content.

Aug. 2020 Vol 01 | Issue 01

कला समीक्षा

अस्वस्थ वर्तमान आणि कलावंतांची भूमिका – गौतमीपुत्र कांबळे

’वर्तमानात जगा’ (Live in Present) असं अनेक तत्त्वेत्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय. भूतकाळाचं अनावश्यक ओझं वर्तमानावर लादल्यामुळे आणि भविष्याच्या अंधारात निरर्थक चाचपडण्यामुळं हातातील वर्तमान निसटून जाईल. असं त्यांचं म्हणणं असतं. तशी वर्तमान ही अवस्था सापेक्षच. त्यामुळं कोणत्याही वर्तमानाला त्याच्या बऱ्या वाईट भूतकाळाचं ओझं जसं टाकून देता येत नाही तसेच
भविष्याच्या अगदी गडद काळोखात डोकावणाऱ्या वर्तमानाला कोणी रोखूही शकत नाही.

प्रत्येक वर्तमान कमी-जास्त प्रमाणात अस्वस्थ करणारा असतोच. ज्यांचं अस्तित्व असुरक्षित आणि धोक्यात येतं अशा व्यक्ती आणि समूहही अस्वस्थ असतात. विवेकी आणि संवेदनशील व्यक्ती तर कायमच अस्वस्थ असतात. त्यांची ही अस्वस्थता कोणत्याही कारणाने व्यक्त झाली नाही तर ते आणखीनच अस्वस्थ होतात नि अभिव्यक्तीचा स्फोट होऊन क्रांतीची पहाट दिसू लागते. हे इतिहासाने अनेकदा सिध्द केले आहे. आज जगातील एकूण मानवाचं अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या कोरोना महामारीच्या वर्तमानात विवेकी-अविवेकी, संवेदनशील-असंवेदनशील असे सगळेच अस्वस्थ आहेत, अवघा वर्तमान अस्वस्थ आहे, म्हणून ’अस्वस्थ वर्तमान.’ या कोरोना- महामारीविरुध्द समाजातील अनेक घटक जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून प्राण पणाला लाऊन लढत आहेत. त्यामध्ये डॉक्टर्स, सफाई कामगार, प्रशासन, पोलिस इत्यादींचा सहभाग दखलपात्र. अशा या ’अस्वस्थ वर्तमाना’त कलावंत कोणती आणि कशी भूमिका पार पाडताहेत यासंबंधीचं हे एक टिपण. मात्र येथे सर्वच क्षेत्रातील कलावंतांचा विचार केलेला नाही. किंवा कोणा एका कलावंताच्या सर्व कलाकृतींचाही विचार केलेला नाही. काही चित्रकार, शिल्पकार, फोटोग्राफर, कवी यांच्या काही कलाकृतींचा प्रातिनिधिक स्वरुपात विचार केला आहे. शिवाय या क्षेत्रातील माझ्याही मर्यादा आहेतच.

Duane Preble आणि Sarah Preble ARTFORMS (Second Edition) . ‘WHAT CAN ART DO FOR THE PRESENT AND THE FUTURE? त्याचे पुन्हा दोन भाग केलेत. 1) ART REVEALS THE PROBLEM आणि 2) ART HELPS FORM THE SOLUTION म्हणजे कला समस्येला उजेडात आणते आणि तिच्या सोडवणुकीचे सूत्रही मांडते. कलावंतांने या दोन्ही कसोट्या पूर्ण करायच्या तर त्यासाठी वर्तमानाला थेट भिडणं, वर्तमानाचं संदर्भासह आकलन करुन घेणं, त्याचा अचूक अन्वयार्थ लावणं आणि पथदर्शक भाष्य करणं आवश्यक ठरतं.

एकूण मानवी अस्तित्वच धोक्यात आणणाऱ्या कोरोना महामारीमुळे ’आज जिवंत राहणे’ ही मोठी आणि प्राथमिक समस्या म्हणून पुढं आलेली आहे. अगदी उद्योगपती रतन टाटापासून ते गावपातळीवरच्या कार्यकर्त्यापर्यंत सगळेच म्हणताहेत की, ’जिवंत कसे राहायचे, त्याची काळजी घ्या. बाकी सगळ्या गोष्टी गौण’. परंतु व्यक्ती वा मानवी समूह जिवंत असणे म्हणजे काय? केवळ श्वाच्छोच्छवास चालू असणे म्हणजे जिवंत असणे काय? माणसाच्या, ‘Man is a social animal’ पासून ते, Man is laughing animal पर्यंत अनेक व्याख्या केल्यात. आणि आज आपण अनुभवित आहोत की आजचा माणूस सामाजिकतेपासून बेदखल झालाय. तसाच तो हसण्यापासूनही बेदखल झालाय. एका उर्दू कवितेत म्हटलंय,

तकल्लुफसा आ ही जाता है मेरे हँसी में ।
सलीका भूल चुका हुँ मुस्कुराने का ।।

आजच्या माणसांची काहीशी अशीच अवस्था झालीय. तो जसा हसणारा प्राणी राहिला नाही तसाच तो सामाजिक प्राणीही राहिला नाही.


Prof. Gautamiputra Kamble

Philosopher, Author, Educationist

Disclaimer

The opinions of the author expressed in this article are his personal. They do not reflect the opinions or views of those of Samyak Drishti or its team.